आळंदी: अर्ज, विनंत्या आणि निवेदन देऊनदेखील पाण्याची समस्या ‘जैसे थे’च राहात असल्याने अखेर संतप्त आळंदीकर रस्त्यावर उतरले. आळंदी नगरपरिषद टाऊन हॉलसमोर आंदोलन करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
पाण्याची समस्या सोडवा अन्यथा येत्या काळात तीव- आंदोलन छेडू, असा इशारादेखील आळंदीकरांनी प्रशासनाला दिला. कडक पोलिस बंदोबस्तात उग्र आंदोलन झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत.
आळंदी शहरात पाणीटंचाईने नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चार ते पाच दिवसांआड केवळ एक ते दीड तासच पाणीपुरवठा होत असल्याने पिण्यासह दैनंदिन गरजांसाठीही पाण्याची वणवण नागरिकांना भेडसावत आहे. या अनियमित आणि अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आळंदीकरांनी सोमवारी (दि. 7) नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी मागील मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि आमदार बाबाजी काळे यांच्या बैठकीचा आढावा घेत लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी त्यांना निवेदन सादर करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
पाणीपुरवठा व्यवस्था दुरुस्तीदरम्यान नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यानेही नागरिकांचा संताप वाढला आहे. ग्रामस्थांनी मागणी केली की, अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून पाणीपट्टी वसूल करावी आणि पालिका कर्मचार्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत.
केलेल्या मागण्या ठरलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर तीव- जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारादेखील ग्रामस्थांनी या वेळी दिला. आंदोलनादरम्यान आळंदी पोलिस ठाण्याकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
कायमस्वरूपी अधिकारी नियुक्ती: पाणीपुरठा विभागप्रमुख म्हणून आळंदीची पूर्ण माहिती असलेल्या पुरुष अधिकार्याची नियुक्ती करावी.
जलवाहिनीचे काम त्वरित सुरू करा: इंद्रायणीनगर ते वाय जंक्शन जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करावे, जेणेकरून शहराला नियमित पाणी मिळेल.
जलकुंभ बांधणी: दोन जलकुंभ बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून कामाला गती द्यावी, कारण साठवण टाक्या नसल्याने भामा आसखेडचा पाणीपुरवठा बंद झाल्यास संपूर्ण शहर अडचणीत येते.
एक दिवसाआड पाणी : सर्व कामे पूर्ण होईपर्यत एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा आणि त्याचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करावे.
अनधिकृत कनेक्शन्सवर कारवाई: अनधिकृत नळजोडणीधारकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करावी आणि कारवाई करावी.
कर्मचार्यांवर कारवाई: शहरात आणि हद्दीबाहेर अनधिकृत नळजोड देणार्या कर्मचार्यांवर कठोर पावले उचलावीत.
दैनंदिन पाणी किंवा पाणीपट्टी माफ: दररोज पाणी मिळावे, अन्यथा वर्षभराची पाणीपट्टी आकारू नये.