Government Diwali Gift
पुणे : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील विविध अंगणवाड्यामध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयांची 'भाऊबीज भेट' राज्य शासनाने जाहीर केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच अदा करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय शासनाचे अवर सचिव सुनील सरदार यांनी जारी केला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 1 लाख 10 हजार 44 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्या अंगणवाड्यांध्ये मानधनावर सुमारे 1 लाख 10 हजार 597 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. या सेविका तसेच मदतनीस यांना दरवर्षी राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने 'भाऊबीज भेट' दिवाळी सणाचे औचित्य साधून देण्यात येत असते.
त्यानुसार यावर्षी दिवाळीपूर्वीच सेविका, मदतनीस यांना दोन हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या 'भाऊबीज भेट' साठी राज्य शासनाने सुमारे 40 कोटी 61 लाख रूपयांची तरतूद केलेली आहे.