पुणे: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पुढील भरतीसाठी आता जिल्हा परिषदस्तरावर वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग जामसिंग गिरासे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतील 22 पैकी तीन प्रकल्पांमधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत 20 अंगणवाडी सेविका आणि 30 मदतनीस त्यांच्या पदावर रुजू झाल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण 4 हजार 395 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे आहेत. यापैकी सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत 202 अंगणवाडी सेविका आणि 499 मदतनीस पदांसाठी भरती केली जात आहे.
जिल्ह्यातील 22 अंगणवाडी प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्याने निवड झालेल्या सेविका आणि मदतनीस रुजू झाले आहेत. या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच इतर निकषही तपासले जात आहेत. यामध्ये बारावीची टक्केवारी, पदवीधर, पदव्युत्तर अशा उच्च शैक्षणिक पात्रतेला गुण दिले जात आहेत. यासोबतच विधवा, अनाथ, प्रवर्ग आणि अनुभवानुसार उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यात येत आहेत.
अर्ज सादर केल्यानंतर त्यांची छाननी केली जाते आणि त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीवर आक्षेप मागविण्यात येतात. प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करून गुणानुक्रमे पंचायत समिती स्तरावरून नियुक्तीचे आदेश दिले जातात.
या संदर्भात जामसिंग गिरासे म्हणाले, बावीस प्रकल्पांपैकी आत्तापर्यंत तीन प्रकल्पांची भरती पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रकल्पांची भरती प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि सर्व नवीन सेविका व मदतनीस मे महिन्यापर्यंत आपापल्या पदांवर रुजू होतील. त्यानंतर या सर्वांचे एकत्रित प्रशिक्षण आयोजित केले जाईल.