कामशेत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील विद्यार्थ्यांना अंगणवाडी शाळेत चिखलातून जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंगणवाडीत 65 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अंगणवाडीचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. शाळेच्या बाजूला गवत वाढले असून, डास-कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या शिवाय अंगणवाडीमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. त्यामुळे मुलांना बसणे अवघड झाले असल्यामुळे पालकही आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवत नाहीत. या संदर्भात चंद्रकांत ओहाळ, संतोष कदम, किशोर ओव्हाळ, किसनराव अहिरे यांनी गटविकास अधिकारी यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. तसेच, अधिकार्यांकडे संबंधित रस्ता दुुरुस्त करण्याची मागणी केली आहे.