पुणे

लोणी भापकर : अंगणवाडी भरते पत्र्याच्या शेडमध्ये

अमृता चौगुले

लोणी भापकर; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील लोणी भापकरच्या भापकर वस्तीवरील अंगणवाडी शाळेची दुरवस्था झाली असून, ही शाळा 25 वर्षांपूर्वी बांधलेली आहे. या अंगणवाडीच्या भिंतीची पडझड झाली असून, ती कधीही पडू शकते. या शाळेमध्ये मुलांना बसवणे धोकादायक बनले आहे. सध्या या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही चिमुकली मुले बसून अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. या पडझड झालेल्या इमारतीमुळे लहान मुले, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना या ठिकाणी शाळा भरविणे धोक्याचे झाले आहे.
शाळेच्या इमारतीची भिंत कधी ढासळेल हे सांगता येत नाही. तरीही या परिस्थितीत या ठिकाणी शाळेत मुले येतात.

या ठिकाणी नवीन इमारतही मंजूर झाली असून, या इमारतीचे बर्‍याच वर्षांपासून काम अर्धवट राहिले आहे. ते काम अपूर्ण अवस्थेत का आहे, हा प्रश्नच आहे. त्याचे पैसेदेखील काढण्यात आले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत व संबंधित विभाग दखल घेत नाही. हे काम 2013-14 या वर्षात मंजूर झाले असून, ते काम आजही अपूर्ण अवस्थेत पडलेले आहे. हे काम लोणी भापकर ग्रामपंचायत यांनी केले आहे. राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व भापकरवस्तीला नवीन अंगणवाडी इमारत मिळावी, अशी ग्रामस्थ व पालकांची मागणी आहे.

या अर्धवट कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी बारामती पंचायत समिती व संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर नवनाथ भापकर, विजय मासाळ, अमोल भापकर, कोमल शिळीमकर, माणिक शेळके अशा अनेक पालक व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

सध्या या मुलांची तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, खोलीची दुरुस्ती केली आहे. राहिलेली नवीन काम दोन महिन्यांत पूर्ण करू.

– गीतांजली भापकर,
सरपंच, लोणी भापकर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT