बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : आणे, साकोरी, पारगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर रविवारी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सर्वच केंद्रांवर 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. बर्याच नवमतदारांची नावे यादीत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. आणे गावातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
प्रभाग क्रमांक चारमधील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. इतर मतदान केंद्रांवर दुपारी चारनंतर मतदान संथगतीने झाले. नवमतदार व अनेकांची नावे मतदार यादीत न आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
आणे येथील 82 वर्षांच्या सुलभा शांताराम आंबेकर यांनी, तसेच 83 वयाच्या दिव्यांग वसंत महामुनी यांनीही मतदान केले. आणे, साकोरी गावांत शांततेत मतदान झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले.