पुणे: आयुष कोमकर खून प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा ऐवज घरझडतीत जप्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर आणि संबंधित टोळीतील सदस्यांची बँकेची तब्बल 27 खाती गोठवली असून, त्या खात्यांत 50 लाख 66 हजार 999 रुपये इतकी रक्कम असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम आरोपींच्या मालमत्तेव्यतिरिक्त असून, मालमत्ताही कोट्यवधींत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, टोळीच्या सर्व सदस्यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात आंदेकर टोळीतील सदस्यांनी रेकी केल्याचा प्रकार समोर आला होता. (Latest Pune News)
वनराज यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह इतर आरोपींची घरे या परिसरात आहेत. त्यांच्या घरांची रेकी करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. तो तपास आता पुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांनी दिली.
महिनाअखेरीस भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. डोके गणेश पेठ) याला पकडले. त्याच्याकडे चौकशीत रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आंदेकर टोळीच्या रडारवर कोण होते, हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. वनराज यांचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत.
दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वनराज यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करीत कोयत्याने वार करून खून केला होता. या प्रकरणात कृष्णा आंदेकर, दत्ता बाळू काळे, यश मोहिते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, येथील बदल्याचा प्लॅन फसल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा गोळ्या घालून खून केला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह 15 जणांना अटक केली आहे.
सात-आठ जणांना पाच वेपन घेऊन पाठवलेय...
कृष्णा आंदेकर याने खोलीसाठी पाच हजार रुपये देऊन काळेला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठविल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेने वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींची घरे पाहिली. त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सॲप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असे सांगितले. मात्र, तो आला नाही.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे काळेने यश पाटीलला कॉल केला. त्या वेळी पाटीलने काळे याला अमनला कॉल करण्यास सांगतो, असे म्हटले होते. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता कृष्णाने काळेला कॉल करून सात ते आठ जणांना पाच वेपन घेऊन पाठविले आहे, असे सांगितले होते.