Anantrao Thopte Funeral Pudhari
पुणे

Anantrao Thopte Funeral: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

सकाळी 10 वाजता भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

भोर: काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता राहत्या घरी (शिवप्रेरणा, भोर पोलिस ठाण्यासमोर) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. वार्धक्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. गुरुवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले, असे त्यांचे चिरंजीव आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

दिवंगत अनंतराव थोपटे यांनी राज्याच्या राजकारणात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांनी अनेक वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी शिक्षणमंत्री, परिवहन, दुग्धविकास, पुनर्वसन संवर्धन आदी खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्षे भूविकास बँकेचे संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक होते. प्रशासन आणि विकासकामांचा उत्तम समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यात आणि ग्रामीण भागात पक्षाचा पाया भक्कम करण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे मानले जाते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक अनुभवी, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुसंस्कृत, आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपले: सुनेत्रा पवार

ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग््राामीण विकास, शेती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्यपूर्ण काम केले, असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

अल्प परिचय

जन्मगाव : हातनोशी, ता. भोर, जि. पुणे

जन्म दिनांक : 11 जानेवारी 1933

शिक्षण : बी. ए (अर्थशास्त्र) आणि जी. डी. सी. ॲंड. ए

शासकीय नोकरी : महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात 1958 मध्ये त्यांनी प्रारंभ केला. सहकार विस्तार अधिकारी, भूविकास बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक, वेल्हा तालुका गटविकास अधिकारी, यशवंत सुत गिरणी भोर येथील प्रशासक.

आमदार : 1972-2009 पर्यंतच्या काळामध्ये 29 वर्षे, तब्बल

सहा वेळा आमदार.

1972 ते 1978 पहिल्यांदा आमदार

1980 ते 1985 दुसऱ्यांदा आमदार

1985 ते 1990 तिसऱ्यांदा आमदार

1990 ते 1995 चौथ्यांदा आमदार

1995 ते 1999 पाचव्यांदा आमदार

2004 ते 2009 सहाव्यांदा आमदार

1978 ला अपक्ष तत्कालीन आमदार संपतराव जेधे व 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार काशीनाथ खुटवड यांनी थोपटे यांना पराभूत केले होते.

मंत्री : 1982 पहिल्यांदा ग््राामविकास, दुग्धविकास, पशुसंवर्धन व पुनर्वसन, 1985 दुग्धविकास, पशुसंवर्धन, फलोत्पादन व परिवहन, 1992 शिक्षण खाते व कृषी व विधिमंडळ कामकाज असे 14 वर्षे मंत्री होते.

दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग््राामविकास, रोजगार हमी योजना, परिवहन, फलोद्यान, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, पुनर्वसन, कृषी, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा एकूण 11 खात्यांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. अभ्यासू व ठोस निर्णयामुळे कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्र ख्याती आहे.

शासकीय समितीचे अध्यक्ष व अन्य पदे

1995/96 : महाराष्ट्र प्रदेश काँग््रेास आय कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड.

1995/96 : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक भोर तालुका संचालकपदी निवड.

1988 : राजगड सहसाखर कारखान्याची निर्मिती. संस्थापक व अध्यक्ष.

1975 : दत्त दिगंबर सहकारी कामगार वाहतूक संस्था स्थापना, संस्थापक व अध्यक्ष.

1981 : रायरेश्वर डोंगरी परिषद संस्था स्थापन.

1982 : राजगड ज्ञानपीठ संकुल भोरची स्थापना. सद्यःस्थितीत भोर आणि वेल्हे तालुक्यात 30 माध्यमिक शाळा.

1999 : महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT