पुणे

पुणे : ‘आनंदाचा शिधा’ला संपाचे ग्रहण ; दौंड तालुक्यामध्ये योजनेचे 52 हजार 524 लाभार्थी

अमृता चौगुले

खोर : पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाने गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा' वाटण्याचा निर्णय घेतला. याचा केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांना लाभ होणार आहे. दौंड तालुक्यातील 52 हजार 524 जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु, जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एकंदरीतच आनंदाचा शिधाला संपाचे ग्रहण लागले आहे.

गुढीपाडवा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही केडगाव पुरवठा विभागात रवा, चणाडाळ, साखर, पामतेल आलेले नाही. दौंडच्या पुरवठा विभागात काही ठरावीकच वस्तू आल्या आहेत. महसूल विभागाचा सर्व कर्मचारी वर्ग संपावर गेला आहे. मात्र, गावपातळीवर कोतवाल यांना पुरवठा विभागाकडून आलेल्या गाड्या खाली करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती नायब तहसलीदार स्वाती नरुटे यांनी दिली.

संपामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा ठप्प झाल्याने आनंदाचा शिधा गाड्यांमध्ये कधी भरला जाणार, तो गावपातळीवर केव्हा पोहचणार आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या हातात कधी पडणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाने योजना जाहीर केल्यापासून जो-तो लाभार्थी रेशनिंग दुकानात गेल्यावर आनंदाचा शिधा असलेला रवा, चणाडाळ, साखर, पामतेल आले आहे का? असे विचारत आहे. मात्र, त्याला मोकळ्या हाताने परतावे लागत आहे. संपामुळे गुढीपाडव्याला शिधा मिळणे कठीण झाले आहे.

दौंड तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी संपावर असल्याने आनंदचा शिधा अजूनही तालुक्यात आलेला नाही. किती लाभार्थ्यांना याचे वाटप करायचे आहे आणि कोणकोणत्या वस्तूंचे वाटप करायचे आहे याची अजूनही निश्चिती नाही. मात्र, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ही योजना जनतेपर्यंत पोहचविणार आहोत.
                                                                       -स्वाती नरुटे, नायब तहसीलदार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT