पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मंडईमधील गाळ्यांचे रेडिरेकनरनुसार मूल्यांकन करण्यात आल्याने गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मान्यतेला ठेवला आहे. या प्रस्तावानुसार महिन्याला केवळ 32 रुपये भाडे असलेल्या गाळेधारकांना थेट 845 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर गाळेधारकांना भाजीसह इतर वस्तूंचीही विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 31 भाजी मंडई निर्माण केल्या आहेत. या मंडईंमध्ये जवळपास 1400 गाळे आहेत. यामध्ये महात्मा फुले मंडई ही सर्वात जुनी मंडई असून, तेथे तब्बल 1600 गाळे आहेत. हे गाळे भाजी व फळविक्रेत्यांना भाड्याने दिले गेले आहेत. कोरोना काळात शहरातील मंडई बंद असल्याने त्या काळातील भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गाळ्यांचे भाडे 2004 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानंतर आजवर वाढ झालेली नाही. सध्या एका गाळ्याला प्रतिमहा 32 रुपये भाडे असल्याने त्यातून वीज, स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने गाळ्यांचे मूल्यांकन रेडिरेकनर दरानुसार करून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मूल्यांकनानुसार मासिक भाड्याच्या वाढीचे टप्पे ठरवले आहेत.
अशी असेल भाडेवाढ
2019-20 चे एका गाळ्याचे मासिक भाडे 32 रुपये
2008 च्या नियमावलीनुसार गाळ्याचे मूल्यांकन केले
मूल्यांकनासाठी आलेला दर 618 रुपये अधिक कर
227 रुपये असे एकूण 845 रुपये
चार वर्षांत 8 पट भाडेवाढ केली जाणार
2021-22 ला पाच पट भाडेवाढ – 527 रुपये प्रतिमहा
2022-23 ला सहा पट भाडेवाढ – 634 रुपये प्रतिमहा
2023-24 ला सात पट भाडेवाढ – 739 रुपये प्रतिमहा
2024-25 ला आठ पट भाडेवाढ – 845 रुपये