जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरोली सुलतानपूर येथील जगदाळेमळा येथे राहात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सुमारे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 30 डिसेंबर) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातील दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याने दोन्ही कानाला दुखापत झाली आहे, तसेच डोक्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याने डोक्याला व कानाला 12 टाके पडले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळ्यात तुकाराम गणपत आतकरी (वय 72) व त्यांची पत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी (वय 65) हे दोघेच राहतात. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लाकडी दांडक्याने या वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले, तसेच कानातील दागिने निघत नसल्यामुळे अक्षरश: ते ओरबडून काढल्याने त्यांचक दोन्ही कान तुटले आहेत. वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच लॉकरमधील दागिने, रोख 1 लाख 20 हजार रुपये या चोरट्यांनी लंपास केले
चोरट्यांनी एकूण 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला असून, या दाम्पत्याला जबर मारहाण केल्याने दोघेही बेशुद्ध पडले होते. काही वेळाने तुकाराम आतकरी शुद्धीवर आल्यावर त्यांनी बाजूच्या घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे बाजूची लोक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व याबाबतची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यामुळे काही वेळातच नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहोचले. डॉग स्कॉड व दरवाजावरील बोटांचे ठसे घेण्यासाठी ‘फिंगरप्रिंट एक्सपर्ट‘ यांना पाचरण केले होते. या घटनेबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक जे. पाटील करीत आहेत.
एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये हे दोघेच वृद्ध दाम्पत राहात आहे, याबाबतची या चोरट्यांनी रेकी केली असावी व पाळत ठेवून हा दरोडा टाकला असावा, असा संशय स्थानिक नागरिकांना आहे. बाजूला इतर घरे असताना याच घरी दरोडा पडल्याने लोकांचा रेकीचा संशय बळावला आहे. चोरट्यांनी घरातील बॅगा व त्यातील कागदपत्रे बाजूला शेतात फेकून दिली. तसेच दाम्पत्याला ज्या दांडक्याने मारहाण केली ते दांडकेसुद्धा त्याच ठिकाणी टाकून ते पळून गेले.
सुलतानपूर येथील या घटनेमुळे परिसरातील लोक भयभीत झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. चोरट्यांनी मारहाण केलेले वृद्ध जोडपे यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सन 2007 मध्ये याच गावात चोरट्यांनी किसन गोपाळ आतकरी यांची हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा या परिसरामध्ये अशा प्रकारच्या दरोडा पडल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.