Crime In Pune: पूर्वीच्या वादातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला. या वेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या दोन मित्रांनादेखील मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी, मुंढवा पोलिसांनी महेश गजसिंह आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुषार मेमाणे यांनी फिर्याद दिली. तर अजय पवार (वय 31), अमित परदेशी (वय 26), सोहेश अलमले (वय 26) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (दि.21) मध्यरात्री बी. टी. कवडे रोड घोरपडी परिसरात घडली आहे.
फिर्यादी मेमाणे हे त्यांचे मित्र अमित परदेशी, अजय पवार, विनायक म्हेत्रे यांचेसह जेवण करण्यासाठी परदेशी यांच्या चारचाकी गाडीतून गेले होते. परत आल्यानंतर बी. टी. कवडे रोड येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी परदेशी याचे मित्र सोहेश अलमले आणि इतर आले होते. त्यावेळी आरोपी गजसिंह हा त्याच्या दोन- तीन साथीदारांसोबत तेथे आला.
पूर्वीच्या वादातून आरोपींनी अमित परदेशी याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. तर फिर्यादी मेमाणे यांना हाताने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. तसेच सोहेश याच्या कानाजवळ वार करून जखमी केले. गजसिंह याने अजय पवार याच्या डोक्यात, मानेवर, पाठीमध्ये, दोन्ही पायावर वार करून गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे तपास करत आहेत.