मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, शिवसेना उपनेते आणि लोकसभेचे प्रबळ दावेदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असला तरी त्यांची निवड करून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात खासदारकीच्या उमेदवारीपासून दूर करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन वेळा विजयी झाले होते.
मात्र, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. पराभव होऊनही आढळराव पाटील यांनी खचून न जाता पुन्हा मतदारसंघात आपले वर्चस्व वाढवले असून, गेली चार ते पाच वर्षे ते मतदारसंघात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत धावपळ करत आहेत. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असलेले संबंध लक्षात घेता त्यांनी खासदार नसतानाही मतदारसंघात विकासकामांसाठी निधीचा धडाका सुरू केला तसेच विविध गावांत दौरे, पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केले असून, तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी मिळावी यासाठी ते कामाला लागले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद देत मोठी जबाबदारी दिली आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री होताच आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी या मतदारसंघात आढळराव पाटलांना म्हाडाचे अध्यक्षपद दिले असल्याचे बोलले जात आहे.
मी 2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचा उमेदवार राहणार, असा दावा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. गरिबांना घर मिळणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्रीन प्रोजेक्ट आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक व या पदाचा काही संबंध नसल्याचे आढळराव पाटील म्हणाले. कोल्हापूर येथे आयोजित शिवसेनेच्या महाअधिवेशन कार्यक्रम प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा