पुणे; पुढारी वृत्तसेवा : आज वयाच्या या उंबरठ्यावर मागे वळून पाहताना आनंद आणि चित्रकारासारखी मानसिक अवस्था झाली आहे. कलाकारामध्ये कधीच पूर्णतेची भावना नसते. अजून वेगळे चांगले काय करता येईल याचा विचार तो करत असतो. कलाकृती अशाच घडत जातात, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी शनिवारी व्यक्त केली.
महक संस्थेच्या 30 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमांतर्गत राजदत्त यांचा एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. पूना गेस्ट हाऊसच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी, प्रतिभा शाहू मोडक, जयमाला इनामदार, आनंद माडगूळकर, डॉ. सलील कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात राजेश दामले यांनी राजदत्त यांच्याशी संवाद साधला. अनेक विषयांवर राजदत्त यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. कार्यक्रमात मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर आणि वंडरबॉय पृथ्वीराज यांनी राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाजलेली गीते सादर केली. माझे गुरू राजा परांजपे यांनी मला दिशा दिली. कायम मला शिकवित राहिले. त्याच भूमिकेत राहून यापुढे काम करीत राहीन, असेही राजदत्त यांनी सांगितले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा झाल्यानंतर विदर्भातून पुण्यात एका वृत्तपत्रात काम करण्यासाठी आलो. पण, माझा पायगुण इतका चांगला की, ते बंद पडले, अशी मिश्कील आठवणही त्यांनी सांगितली. त्यानंतर मद्रासमध्ये चांदोबा मासिकासाठी काम करीत होतो. तिथेच गुरू राजा परांजपे यांच्याशी ओळख झाली आणि मग पुण्यात त्यांच्या हाताखाली काम करायला लागलो. तेव्हा मी त्यांचा असिस्टंट होतो, माणूस होण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा माणसे बोलायला लागतात, त्यांची मनस्थिती कळते, त्याचेच प्रतिबिंब पात्रांमध्ये उमटते. संवेदनशीलता प्रत्येकात असते, आपण ती मातीत घालतो. संवेदनशीलता जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.