पुणे

Amruta Fadnavis : 'लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर मारलं पाहिजे'

'कायद्याने अशा गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये'

पुढारी वृत्तसेवा

पुणे : "लहान मुलांवर अत्याचार करणारे नराधम आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये. माझे वैयक्तिक मत विचाराल तर अशा क्रूर लोकांना रस्त्यावरच मारले पाहिजे. आपण लोकशाहीत जगतो ही गोष्ट वेगळी, पण कायद्याने अशा गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये," अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. पुण्यात एका घरगुती कार्यक्रमासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सतर्क राहणे काळाची गरज

अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, सध्या पालकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. अनेकदा विश्वासातील व्यक्तींकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याचे समोर येत आहे, ही चिंतेची बाब आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना समाजात वावरू न देता कायमस्वरूपी तुरुंगात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजात योग्य शिक्षण आणि जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, सरकारला दिला सल्ला

"असे क्रूर गुन्हेगार बाहेर येतातच कसे? हा माझा मोठा प्रश्न आहे," असे म्हणत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात विचारणा करणार असल्याचे सांगितले. कायद्यात कुठे त्रुटी राहिल्या आहेत का, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जे नराधम अत्याचार करतात, त्यांच्या पाठीशी कोणीही उभे राहू नये आणि अशा क्रूर लोकांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. देशातील सर्वात कठोर कायदा अशा गुन्हेगारांना लागू करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कॉर्पोरेट क्षेत्रातील कारवाईचा दाखला

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 'सेक्शुअल हॅरॅसमेंट' संदर्भात कडक नियम असतात. तिथे अशा तक्रारींवर त्वरित अधिकृत कारवाई केली जाते आणि गुन्हे दाखल होतात. त्याच धर्तीवर सामाजिक स्तरावरही तातडीने ॲक्शन घेणे गरजेचे आहे, तरच असले गुन्हे थांबतील.

महिला मुख्यमंत्र्यांबाबत मोठे विधान

राज्यातील नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी महत्त्वाचे विधान केले. "जी महिला पुढे येऊन अन्यायाविरुद्ध लढेल, मग त्या सुनेत्रा वहिनी असोत किंवा भाजपची कोणतीही महिला नेत्या, त्यांनी पुढे येऊन राज्याचे मुख्यमंत्री बनले पाहिजे," असे त्या म्हणाल्या. महिलांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेतृत्वाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, काकडे यांच्या घरातील लहान बाळाचे कौतुक करताना त्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. "बाळ खूप सुंदर आहे, 'विक्रम' हे नावही खूप छान आहे," असे म्हणत त्यांनी घरगुती वातावरणात आनंद व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT