पुणे

येरवडा ते ‘आपले घर’ भूसंपादनाची रक्कम फुगली!

अमृता चौगुले

माउली शिंदे

वडगाव शेरी(पुणे) : येरवडा ते 'आपले घर'दरम्यान सात किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरणाचे काम 15 ठिकाणच्या भूसंपादनामुळे रखडले आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी 622 कोटी 29 लाख 50 हजार 130 रुपयांची गरज होती; परंतु वेळेवर भूसंपादन झाले नसल्याने आता ही रक्कम 916 कोटी 63 लाख 87 हजार 543 रुपये झाली आहे. भूसंपादनाच्या खर्चात आता 294 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) पुणे-नगर महामार्गावरील येरवडा ते 'आपले घर' दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूंना 60 मीटरचा आहे. मात्र, अद्यापही रुंदीकरणासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले नाही, यामुळे अनेक ठिकाणी चौकात हा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भूसंपादनाबाबत 'नगर रोड सिटीझन फोरम'च्या कनिझ सुखराणी यांनी महापालिका प्रशासनाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती.

या अर्जाला उत्तर देताना भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी कळवले आहे की, डीपी रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. येरवडा, वडगाव शेरी, लोहगाव या भागात महापालिकेच्या हद्दीत भूसंपादनाची कार्यवाही विशेष अधिकारी यांच्यामार्फत सुरू आहे. प्रारूप निवाडा मंजुरीनंतर 802 कोटी 07 लाख 04 हजार 888 रुपये रक्कम भरणे प्रलंबित आहे. तसेच वडगाव शेरी, लोहगाव, खराडी, नगर रस्ता सीटीआर कंपनी ते महापालिकेच्या नवीन हद्दीत 60 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी 114 कोटी 56 लाख 82 हजार 655 रुपये रक्कम निवाडा रक्कम भरणे प्रलंबित आहे.

वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

  • रुंदीकरण न झाल्याने नगर रोडवरील चौकांत वाहतूक कोंडी
  • भूसंपादनाअभावी मोबदल्याच्या रकमेत मोठी वाढ
  • रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने सेवा रस्ते कागदावरच
  • विमाननगर चौक, इनऑर्बिट चौक, शास्त्रीनगर येथे वाहतूक समस्या
  • महापालिका प्रशासनाकडून भूसंपादनाचे काम संथगतीने

डीपी आराखड्यानुसार नगर रस्ता दोन्ही बाजूंना 60 मीटर न केल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी-जास्त झाली आहे. पंधरा ठिकाणी भूसंपादनाअभावी रुंदीकरणाचे काम बाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरणाचा प्रश्न कागदावरच आहे. जागामालकांनी रस्त्यासाठी जागा दिली, तरच त्यांच्या प्रकल्पांना मान्यता द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे

कनिझ सुखराणी,
नगर रोड सिटीझन फोरम

भूसंपादनाची मूळ रक्कम कमी आहे. परंतु, दरवर्षी त्या रकमेवर 12 टक्के व्याज लागते, त्यामुळे ती वाढली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जसा निधी उपलब्ध होईल, तसे काम सुरू आहे. निधीअभावी काम प्रलंबित राहात आहे.

-प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन व व्यवस्थापन विभाग, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT