देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय' पुरस्कार प्रदान करण्यात आला 
पुणे

Lokmanya Tilak Puraskar | अजित डोवाल यांच्यामुळेच देश अंतर्बाह्य सुरक्षित : गृहमंत्री अमित शहा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय' पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

पुणे : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामुळेच आज आपला देश अंतर्बाह्य सुरक्षित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांची नियुक्ती केली. डोवाल यांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून देशासाठी योगदान दिले, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.

पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक, डॉ. गीताली टिळक आदी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी देशाला 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' हा बीजमंत्र दिला. स्वराज्य म्हणजे आपली भाषा, संस्कृती आणि धर्म होय. त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करण्याची प्रथा सुरू करून देशातील जनतेला जोडण्याचे काम करीत 'सांस्कृतिक राष्ट्रवाद'ची मुहूर्तमेढ रोवली. आज देश याच राष्ट्रवादावर चालत असून, त्याला कोणी मागे खेचू शकत नाही. पत्रकार किती निर्भीड असू शकतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. इंग्रज केवळ 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्राला घाबरत होते. कोट्यवधी लोकांच्या मनात स्वराज्याची ज्योत त्यांनी पेटवली. संघटनेशिवाय राष्ट्रशक्ती उभारू शकत नाही, हे त्यांनी सांगितले. त्यांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ सर्व युवकांनी वाचावा. ते चुकीच्या रस्त्याने कधी जाणार नाहीत.

शहा यांची डोवाल आणि मोदींवर स्तुतिसुमने

कोणताही पुरस्कार हा लोकांना प्रेरणा देणारा, त्या व्यक्तीचा कामाचा सन्मान करणारा असतो. डोवाल यांच्यासारख्या लोकांनी देशाला जीवन समर्पित केले. त्यांच्यासारख्या व्यक्तींना हा पुरस्कार देणे हा देशातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. मी गुजरातमध्ये गृहमंत्री असताना एकदा बॉम्बस्फोट झाल्यावर तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा तपास करण्यासाठी डोवाल यांना बोलावण्यास सांगितले. त्यानंतर गुजरातमधील १३ साखळी बॉम्बस्फोट उघडकीस आले होते, असे म्हणत शहा यांनी पंतप्रधान मोदी आणि डोवाल यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

एका चाणक्याने दुसऱ्या चाणक्याचा सन्मान केला : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित डोवाल हे देशाच्या सुरक्षेचे चाणक्य आहेत, तर गृहमंत्री अमित शहा हे राजकीय चाणक्य आहेत. त्यामुळे एका चाणक्याने दुसऱ्या चाणक्याचा यथोचित सन्मान केला आहे. भारत हा आता मार खाणारा देश राहिला नसून, शत्रूच्या घरात शिरून मारणारा देश झाला आहे. परखडपणे मत मांडणारे व्यक्तिमत्त्व डोवालच असून, त्यांनी कधी कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही.

दोन धुरंधर एकत्र आले : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाला स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. दहशतवाद्यांसाठी अजित डोवाल यांचे नावच पुरेसे आहे. देशाच्या सुरक्षेला नवीन दिशा देण्यासाठी रणनीती तयार करण्याचे काम ते करतात. देशाच्या इतिहासात पोलिस सेवेत कीर्तिचक्र एकमेव डोवाल यांनी मिळवले आहे. नवीन भारताचे खरे धुरंधर आणि जेम्स बाँड डोवालच आहेत. पण, आता जेम्स बॉंड जुना झाला असून, त्यांना धुरंधरच म्हणणे योग्य राहील. अमित शहा यांनी देखील नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने त्यांना देखील धुरंधर म्हणणे योग्य राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT