Ambulance Accident Pudhari
पुणे

Otur Accident News: ॲम्बुलन्स व पिकअपची भीषण धडक; चालक जागीच ठार

गायमुखवाडी येथे मध्यरात्री भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: खामुंडी(ता.जुन्नर)येथील अपघातातील जखमी रुग्णाला उपचारासाठी आळेफाटा येथे घेऊन जात असलेल्या ॲम्बुलन्सला भरधाव पिकअपने समोरून जोरदार धडक दिल्याने ॲम्बुलन्स चालक कुणाल तुकाराम डुंबरे (वय 31, रा. डुंबरवाडी, ता. जुन्नर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि. 17) मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता गायमुखवाडी गावाच्या हद्दीत स्पीड ब्रेकरजवळ अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर घडला.

याप्रकरणी शेखर तुकाराम डुंबरे (वय 35, रा. डुंबरवाडी, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नीलकंठ फुलचंद गव्हाणे (रा. शिराळा, ता. व जि. लातूर) याच्याविरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (एमएच 14 एलबी 4329) क्रमांकाची ॲम्बुलन्स घेऊन कुणाल डुंबरे हे खामुंडी येथील अपघातातील जखमी रुग्णाला तातडीने आळेफाटा येथे उपचारासाठी घेऊन जात होते.

त्याचवेळी अहिल्यानगरकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या (एमएच 24 बीडब्ल्यू 2092 ) क्रमांकाच्या पिकअप वाहनाचा चालक नीलकंठ गव्हाणे याने भरधाव, हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवत रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समोरून ॲम्बुलन्सला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत ॲम्बुलन्स चालक कुणाल डुंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात ॲम्बुलन्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार बांबळे, पोलीस हवालदार पालवे, महिला पोलीस हवालदार फापाळे व महिला पोलीस हवालदार मधे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य केले.

अपघातातील दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून, पिकअप चालक नीलकंठ फुलचंद गव्हाणे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अपघाताबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बांबळे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT