मंचर: राज्यात बटाटा पिकासाठी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावर बदलत्या हवामानामुळे शेतीचे चित्र बदलताना दिसत आहे. अनियमित पाऊस आणि वाढत्या पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. येथील शेतकरी संतोष भिकाजी धुमाळ यांनी आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारत पॉलिहाऊसमध्ये गुलाबशेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
सन २००३ पासून गुलाबशेती करणाऱ्या धुमाळ यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. पॉलिहाऊसमध्ये उच्च दर्जाच्या गुलाबांची लागवड सुरू केली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी शेततळे उभारले असून, आठ बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे. ठरावीक अंतराने सिंचन करून त्यांनी उत्पादन सातत्याने वाढवले आहे. जून महिन्यात लागवड केल्यानंतर गुलाबाचे अवघ्या तीन महिन्यांनी पुढे वर्षभर उत्पादन सुरू होते.
लग्नसराईच्या हंगामात गुलाबांना मोठी मागणी असल्याने त्यांना चांगला दर मिळाला होता. त्यानुसार सद्य:स्थितीत एका गुलाबाच्या फुलाला ७ ते १० रुपये दर मिळतो. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही त्यांच्या फुलांना मोठी मागणी आहे. बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास, पाण्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक शेतीचा स्वीकार केल्यास कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळू शकते, हे संतोष धुमाळ यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
पारंपरिक शेतीत अनिश्चितता वाढत असल्याने आम्ही बाजारपेठेचा अभ्यास करून गुलाबशेतीकडे वळलो. पाण्याचे योग्य नियोजन, सातत्य आणि गुणवत्तेमुळे आज आमच्या उत्पादनाला राज्याबाहेरही चांगली मागणी मिळत आहे.संतोष भिकाजी धुमाळ, फुल उत्पादक शेतकरी, पेठ
बटाटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातगाव पठारावर बदलत्या हवामानामुळे शेतीचे चित्र बदलताना दिसत आहे. अनियमित पाऊस आणि वाढत्या पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहे.रामशेठ तोडकर, माजी सरपंच, पेठ