Flower Pudhari
पुणे

Maharashtra Flower Farming Loss: आंबेगावात फुलशेती संकटात; दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल

वाढत्या तापमानाचा फटका, मागणी घटली; खर्चही निघेना म्हणून शेतकऱ्यांची हाक

पुढारी वृत्तसेवा

लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव आणि वाळुंजनगर परिसरात फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, यंदा फुलांचे बाजारभाव घसरल्याने फूल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

वाळुंजनगर येथील तानाजी वाळुंज आणि मेंगडेवाडी येथील सागर रणपिसे यांनी दोन एकर क्षेत्रात ‌‘मार्बल‌’ जातीच्या फुलांची लागवड केली आहे. सध्या फुले तोडणीसाठी तयार असतानाच बाजारभाव कोसळल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वाळुंज यांनी दीड एकर क्षेत्रात कलिंगड पिकासोबत अप्सरा झेंडूचे आंतरपीक घेतले होते. कलिंगडाला समाधानकारक भाव मिळाला; मात्र झेंडूला अत्यल्प दर मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदा चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुलशेतीवर मोठा खर्च केला. खते, कीडनाशके, मजुरीवर खर्च वाढला; मात्र ऐन हंगामात मागणी घटली.

वाढत्या तापमानामुळे उत्पादनात जवळपास निम्मी घट झाली असून, फुलांची गुणवत्ता देखील खालावली आहे. परिणामी, फुले खराब होण्याचे प्रमाण वाढून बाजारभाव कोसळले आहेत. सध्या झेंडूला किलोमागे 20 ते 30 रुपये, बिजलीला 10 ते 20 रुपये, शेवंतीला सुमारे 100 रुपये आणि अष्टरला 60 ते 70 रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे, असे रणपिसे यांनी सांगितले. वाढत्या तापमानामुळे फुलांची प्रत कमी झाली असून, खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच परीक्षांच्या काळामुळे मागणी घटली आणि बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे जयेश वाळुंज यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT