Amalner Beed railway line inauguration
पुणे: रेल्वेच्या पुणे विभागातील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. अमळनेर ते बीड या 67.78 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, अहिल्यानगर ते बीड रेल्वेने थेट प्रवास करता येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 17 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार असून, यावेळी उपमुख्यमंत्री यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर लवकरच यावर डेमो रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. (Latest Pune News)
पाच प्रमुख फायदे
अहिल्यानगर ते बीड थेट रेल्वे सेवेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि आरामदायी होणार आहे.
जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी यांसारख्या नवीन स्थानकांमुळे परिसरातील गावांचा विकास होण्यास आणि त्यांना शहरांशी जोडले जाण्यास मदत होईल.
रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक सुलभ झाल्याने स्थानिक शेती, उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल.
रेल्वे आणि संबंधित सेवांमुळे या भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
सुरक्षित आणि किफायतशीर रेल्वे प्रवासामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
नवीन रेल्वेमार्ग एका दृष्टिक्षेपात
पूर्ण झालेला टप्पा : अमळनेर ते बीड
एकूण लांबी : 67.78 किलोमीटर
एकूण खर्च : 1286 कोटी रुपये
नवीन स्थानके : जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी (नवगण) आणि बीड.
दुसऱ्या टप्प्यातील कामे
मोठे पूल - 15
छोटे पूल - 90
रोड ओव्हर बीज (आरओबी) - 15
रेल्वे अंडर बीज (आरयूबी) - 31
नवीन स्थानके - 5
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ या एकूण 261 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे काम तीन टप्प्यात सुरू आहे. यातील अहिल्यानगर ते आष्टी (अमळनेर) हा पहिला टप्पा यापूर्वीच कार्यान्वित झाला आहे. आता अमळनेर ते बीड हा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यामुळे थेट अहिल्यानगर ते बीड असा रेल्वे प्रवास शक्य होणार आहे. बीड येथील नागरिकांना या मार्गिकेमुळे अहिल्यानगर येथून थेट पुणे-मुंबई प्रवास करणे सोपे होणार आहे. तसेच, बीड ते परळी वैजनाथ या तिसऱ्या टप्प्याचे कामही अंतिम स्तरावर असून ते लवकरच ते पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे.- हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग