पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना आणखी ट्विस्ट बघायला मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा बारामतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने अर्ज घेऊन गेल्यानंतर लगोलग आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या नावाचा देखील उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद- भावजयच्या लढतीमध्ये पवार कुटुंबामधील इतर दोघांनी देखील उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकारण नेमके कुठे चाललेय असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
पक्ष फुटल्यानंतर पवार कुटुंब शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिले आणि जाहीरपणे प्रचार करण्यास सुरुवातही केली. परिणामी, बारामती लोकसभा ही आणखीच प्रतिष्ठेची झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार या येत्या गुरूवारी (दि. 18) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वीच अजित पवार यांच्यासह सुनंदा पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या अर्जात काही चूक झाल्यास तो अर्ज बाद होऊ शकतो.
त्यामुळे खबरदारी म्हणून अजित पवार यांच्यासह तीन उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. अशाच प्रकारची खबरदारी सुप्रिया सुळे यांच्या बाबतीतही घेतल्याचे सांगितले जात आहे. म्हणून सुनंदा पवार यांनीही निवडणूक निर्णय अधिकार्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतला आहे. लक्ष्मीकांत खाबिया यांनी सुनंदा पवार यांच्यासाठी अर्ज घेतला आहे, असे सांगण्यात आले.
हेही वाचा