पुणे

पुणे : चांगल्या कामासह गैरकृत्याची जबाबदारीही तुमचीच!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : "चांगल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जसे माझ्याकडे येता, तसेच तुमच्या हद्दीत होणार्‍या गैरप्रकारांचीही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अधिक झाली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. अनेकदा ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना याबाबत सूचना देऊनही बदल होताना दिसून येत नाही. याबाबत आम्हालाच गंभीर विचार करावा लागेल," असा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.

सोमवारी पोलिस आयुक्तालयात आठवडा बैठक (डब्ल्यूआरएम) पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सर्व अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस ठाणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांत शहर पोलिस दलातील लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे एसीबीने केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात एका महिला सहायक पोलिस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर चतुःशृंगी पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यानंतर काही काळातच कोंढवा पोलिस ठाण्यातील परत एका सहायक पोलिस निरीक्षकांना लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-3 च्या एका कर्मचार्‍याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एकंदरीत, या सर्व घटना पाहता पोलिस आयुक्तांनी सर्व प्रभारी अधिकार्‍यांना बैठकीत चांगलेच फैलावर घेतले.

महिलांच्या तक्रारींबाबत आयुक्तांनी सर्व पोलिस अधिकार्‍यांना परत सूचना दिल्या. तसेच महिलांचे अर्ज गांभीर्याने घेण्याबरोबरच प्रलंबित न ठेवण्याबाबत सांगण्यात आले. गेल्या बैठकीत आयुक्तांनी महिलांच्या तक्रारीबाबत सर्व पोलिस निरीक्षकांना सूचना देऊन प्रलंबित अर्ज काढण्यास सांगितले होते. एवढेच नाही, तर प्रत्येक पोलिस ठाण्यातील तक्रार अर्जांबाबतीत पाठपुरावा देखील केला होता. त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी अर्जांची निर्गती करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला त्याचे सकारात्मक परिणाम देखील पोलिस ठाणे स्तरावर दिसून येत आहेत.

सेवा प्रणाली पुन्हा नव्या जोमाने कार्यान्वित
पुणे पोलिसांनी सुरू केलेली सेवा प्रणाली (सर्व्हिस एक्सलन्स व्हिक्टिम असिस्टन्स) हा उपक्रम लोकाभिमुख असून, त्याचा नागरिकांना खूप चांगला फायदा होत आहे. पोलिस ठाण्यात येणार्‍या सर्व नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण झाले अथवा नाही तसेच त्यांचे पूर्ण निराकरण होऊन पीडितांना मदत मिळावी, या उद्देशाने सेवा अ‍ॅप तयार केले. मात्र, कोरोना संसर्गाच्या कालावधीत पोलिस ठाण्यात येणार्‍या नागरिकांची संख्या घटली होती. त्यामुळे सेवा प्रणालीला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.

मात्र, आता परत नव्या जोमाने ही प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी बैठकीत दिल्या आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या प्रत्येकाचे समाधान झाले पाहिजे. त्यांच्या तक्रारींचे निराकरण झाले पाहिजे. हे वरिष्ठांना समजावे म्हणून ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. एकप्रकारे पोलिस ठाण्यात तक्रारदारांना मिळालेल्या वागणुकीचेच मूल्यमापन या प्रणालीच्या माध्यमातून केले जाते.

त्यामुळे शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना सेवा प्रणालीचे नव्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाची सेवा प्रणालीच्या टॅबमध्ये नोंद ठेवली जाते. त्यासाठी टॅबचे देखली वाटप करण्यात येणार आहे. पूर्वी हे टॅब देण्यात आले होते. मात्र, त्याची सध्याची सुस्थिती पाहून गरज असल्यास नव्याते ते दिले जाणार आहेत. सर्वांत म्हत्त्वाचे म्हणजे वरिष्ठ अधिकारी या प्रणालीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

SCROLL FOR NEXT