पुणे : शहरातील अनेक भागांत तसेच कचरा संकलन केंद्रांवर कचर्याचे ढीग साचत चालले आहेत. शहरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुण्याची वाटचाल ‘स्वच्छ व सुंदर पुणे’कडून ‘अस्वच्छ आणि कुरूप पुणे’ कडे होत असल्याची टीका सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
पुण्यातील काही कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत, तर काही अर्धवट क्षमतेने कार्यरत आहेत. हडपसर येथील 200 टन ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प गेले तीन आठवडे बंद आहे. धायरी येथील 50 टन क्षमतेचा कोरडा कचरा प्रक्रिया प्रकल्पदेखील गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. सुस येथील 200 टन क्षमतेचा प्रकल्प देखील अर्ध्या क्षमतेने चालू आहे. वनाज येथील जुन्या कचरा डेपोमधील रॅम्पची जागा दोन महिन्यांपूर्वी अचानक मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरित केली आहे. परिणामी, कोथरूड, वारजे व कर्वेनगर भागातील रोजचे 125 ट्रक कचरा वनाजऐवजी घोले रोड किंवा कात्रज येथील रॅम्पवर पाठवला जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचे अंतर व वेळ वाढला असून, ट्रक फेर्यांची संख्यादेखील निम्म्यावर आली आहे. यामुळे कचरा उचलण्यात अडथळा निर्माण होऊन शहरातील विविध भागांमध्ये कचर्याचे ढीग साचले आहेत.
वनाज येथील रॅम्पला पर्याय उपलब्ध होण्याआधीच ती जागा मेट्रोला का देण्यात आली? पुणेकर मिळकत करांमध्ये 20 टक्के सफाई कर भरतात, तसेच घराघरांतून कचरा उचलण्यासाठी शुल्कही देतात. त्यामुळे स्वच्छतेचा अधिकार पुणेकरांचा मूलभूत हक्क आहे. फक्त ’स्वच्छ सर्वेक्षण’साठी वरवरची कामे करून, भिंती रंगवून शहर स्वच्छ होणार नाही, असे वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले.
या बाबत महानगर पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभगाचे उपयुक्त संदीप कदम यांना विचारले असता ते म्हणाले, वनाज येथील 50 टन क्षमतेच्या प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे तो देखभाल-दुरुस्तीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. हा कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल. हडपसर येथील ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पदेखील अंतिम टप्प्यात असून तोही लवकर कार्यरत होईल. पावसामुळे कचरा पाठवण्यात अडचणी येत होत्या, मात्र येत्या दिवसांत सर्व अडथळे दूर होऊन कामे सुरळीत सुरू होतील, असे संदीप कदम म्हणाले.