पुणे

पुणे : महापालिकेकडून नवीन वर्षात सर्व सुविधा व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉटवर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेकडून व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉट प्रणालीच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सेवासुविधांची व्याप्ती नवीन वर्षात वाढवली जाणार आहे. सध्या या प्रणालीतून पाणीपट्टी, मिळकतकर भरण्याच्या सुविधा दिल्या जातात. मात्र, नवीन वर्षात पालिकेच्या सर्व सेवासुविधा या प्रणालीतून दिल्या जाणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
महापालिकेकडून नागरिकांना विविध सेवा सुविधा दिल्या जातात. यासाठी नागरिकांना महापालिका भवन किंवा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागते. मात्र, ई गव्हर्नन्स सुरू झाल्यानंतर महापालिकेने विविध सेवा ऑनलाईन सुरू केल्या आहेत.

मोबाईलवर वापरल्या जाणार्‍या व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉटचा उपयोग करून नागरिकांना अधिक जलदगतीने महापालिकेशी संबंधित सेवा, सुविधा एका क्लिकवर मिळाव्यात यासाठी महापालिकेने व्हॉट्स अ‍ॅपकडून 8888251001 हा विशेष क्रमांक जारी केला आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये हा क्रमांक सेव्ह केल्यानंतर हाय शब्द टाईप केल्यानंतर पुढील संवाद सुरू होतो. संध्या या प्रणालीद्वारे मिळकतकर भरणा आणि पाणीपट्टी या सुविधा उपलब्ध आहेत. नवीन वर्षात मात्र पालिकेच्या बहुतांश सेवासुविधा या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यामध्ये जन्म, मृत्यू दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, विविध विभागांची माहिती यासारख्या दैनंदिन निगडित गरजांसोबतच तक्रार नोंदणी या सुविधा व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे 97 हजार नागरिकांनी या प्रणालीचा वापर केला आहे. सध्या या प्रणालीची तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आली असून, टेस्टिंग सुरू आहे. ही प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर नागरिकांची धावपळ थांबेल, अशा विश्वास बिनवडे यांनी व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT