मांडवी नदीचे पात्रच दूषित  Pudhari
पुणे

मांडवीला शेवाळाचा विळखा; पाण्यालाही येतेय दुर्गंधी

ओतूरच्या मांडवी नदीचे पूर्ण पात्रच झाले दूषित

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीचे पूर्ण पात्र शेवाळाने आच्छादले गेले असून, अत्यंत दूषित झाले आहे. सर्वत्र दुर्गंधी सुटली असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील मांडवी नदी ही अनेक गावांची जीवनवाहिनी आहे. या नदीवर बहुतांश ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. ओतूरच्या केटी बंधार्‍याच्या पुढे पाण्याचा प्रवाह अत्यंत कमी असल्याने साठलेल्या पाण्यावर शेवाळाचा दाट थर तयार झाला आहे. त्या पाण्याला दुर्गंधी सुटलेली आहे. याशिवाय ओतूरचा थोरला कचरा डेपो हा नदी किनार्‍यालगतच असून दुतर्फा स्मशानभूमी व दशक्रिया घाटदेखील आहे. त्यामुळे या परिसराचे वातावरण दूषित झाले आहे. अगदी सहन न होणारी दुर्गंधी येथे येत आहे.

नदीचा किनारा स्वच्छ व हरित ठेवण्याची जबाबदारी असणार्‍या प्रशासनाने जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक चालवली असल्याची चर्चा गावात आहे. नदीत सोडलेल्या सांडपाण्याचे व कचरा डेपोचे तातडीने योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. तसेच नदीपात्राच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे ही भविष्यात अडचणीची ठरणार आहेत. या अतिक्रमणांना नेमके अभय कोणाचे? हा प्रश्न अद्यापदेखील गुलदस्त्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT