पुणे

निंबूतच्या शेतकर्‍याला आलेपिकाची साथ

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : निंबूत (ता. बारामती) येथील शेतकरी संभाजी काकडे यांनी शेतात आल्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. पहिल्या वर्षी आल्याचे पीक तोट्यात गेले, तरी यंदा आल्याला प्रतिटन 66 हजारांचा भाव मिळून विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
संभाजी काकडे हे सोमेश्वर विद्यालयातून निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर शेतात प्रयोग राबवीत आहेत. पावणेदोन एकरात त्यांनी आल्याची लागवड केली. पपईबागेत आंतरपीक म्हणून हे पीक घेतले. पहिल्या वर्षी टनाला केवळ दहा हजारांचा दर मिळाला. पहिले वर्ष तोट्यात गेले. मात्र, तरीही हार न मानता यंदा पावणेदोन एकरात लागवड केली. यंदा जागेवरच 66 हजार रुपये प्रतिटन दर मिळाला. पावणेदोन एकरात एकूण 6 लाख 12 हजार रुपये खर्च आला. सुमारे 27 टन उत्पादन, 17 लाख 82 हजारांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता 11 लाख 65 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

आले हे पीक सातारा, कोरेगाव, सांगली या भागात घेतात. पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती तालुक्यांत फारसे घेत नाहीत. सोमेश्वर साखर कारखाना जवळच असल्याने या परिसरात बहुतांश शेतकरी ऊसपीक घेतात. परंतु, काकडे यांनी प्रयोग म्हणून आल्याचे पीक घेतले. कोरेगाव (जि. सातारा) मधून बियाणे आणून लागवड केली. सुरुवातीला पीक व्यवस्थित येईल का नाही? याबाबत शंका होती. मात्र, चांगले पीक आले.

पुढील वर्षी 100 टक्के सेंद्रिय उत्पादन
काकडे यांनी सुरुवातीला शेणखत व बांधणीवेळी कोंबडीखताचा भरपूर वापर केला. सेंद्रिय खतांचा जास्त वापर केला. ड्रिपमधून रासायनिक खतांचा वापरही केला. मात्र, रासायनिक खतांवर केवळ दहा टक्केच भर दिला. मागील वर्षी रासायनिक खतांचा वापर 30 टक्के होता. आता पुढील वर्षी शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेणार असल्याचे काकडे म्हणाले.

SCROLL FOR NEXT