आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील किराणा दुकानातील जबरी चोरीचा तपास करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याचेकडून दोन कारसह मुद्देमाल असा ११ लाख ९६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. चोरीच्या या घटनेतील सात आरोपी फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली. सलमान सादिक शेख (वय २४, रा. मोमीनपुर खाजानगर, जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २० जूनच्या मध्यरात्रीनंतर आळेफाटा परिसरातील नाशिक महामार्गावरील सुरेश भगवान खांडगे यांचे लक्ष्मी किराणा दुकानाचे सिक्युरिटी गार्डला कारमधून आलेल्या चोरट्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम घेऊन त्यास शेजारील बोटा (ता. संगमनेर) गावच्या हद्दीत सोडून दिले. यानंतर पुन्हा येथे येत दुसऱ्या कारमधून आलेल्या साथीदारांसह त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम, सिगरेट व गायछाप तंबाखू असा पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत पोलिस पथकास हा जबरी चोरीचा गुन्हा सलमान शेख व त्याचे साथीदारांनी केल्याचे समजले.
आळेफाटा पोलिसांचे पथकाने बीड येथे सलमान शेख यास ताब्यात घेतले. मात्र यावेळी इतर आरोपी फरार झाले. त्याने इतर साथीदारांसह दोन कारमधून येत चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार (एमएच १२ डीवाय ५९२०) व (एमएच ०२ इएच ४७५८) व पावणेतीन लाखांचा मुद्देमाल अस ११ लाख ९६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जुंबड, प्रशांत तांगडकर, सचिन कोबल यांनी केली.