Alandi Dindi Pudhari
पुणे

Alandi Dindi Procession: इंद्रायणीच्या पुरातही वारकऱ्यांचा उत्साह कायम; संकटांवर मात करत दिंडी पंढरीच्या वाटेवर

पाऊस, पूर आणि खडतर मार्गाचे आव्हान; ‘माउलींच्या कृपेने सर्व संकटे दूर होतील’ म्हणत वारकरी सज्ज

पुढारी वृत्तसेवा

​आळंदी: सतत पडणारा पाऊस आणि संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराशेजारून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला आलेला पूर, यामुळे यंदा 'दिंडी आळंदीतून बाहेर कशी काढायची?' असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पण म्हणतात ना, भक्तीच्या पुरात संकटांचे डोंगरही वाहून जातात! अगदी याच भावनेचा प्रत्यय सध्या आळंदीत पाहायला मिळाला.

दिंडी क्रमांक ८ चे प्रमुख शंकर देवराडकर यांनी येथील परिस्थितीवर बोलताना वारकऱ्यांच्या मनातील नेमकी भावना व्यक्त केली. यंदा पाऊस प्रचंड आहे, इंद्रायणी मातेला मोठा पूर आला आहे. त्यामुळे दिंडी आळंदी शहरातून सुरक्षितपणे बाहेर कशी काढायची, यासंदर्भात आमच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाट खडतर आहे, पण आमचा उत्साह तीळमात्रही कमी झालेला नाही. आम्ही माउलींच्या पालखीसोबत पंढरपूरला जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि तयार आहोत. आळंदीतील चित्र विलोभनीय आणि अंगावर काटा आणणारे आहे.

एका बाजूला इंद्रायणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून घाटांना स्पर्श करत आहे, तर दुसऱ्या बाजूला टाळ-मृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले आहे.

पावसाच्या थंडगार सरी अंगावर झेलत, डोक्यावर गाठोडे आणि हातात विठ्ठलाची पताका घेऊन अनेक वारकरी आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले.​ आता प्रतीक्षा आहे ती माउलींच्या अश्वांची आणि पालखीच्या प्रस्थानाची. विठ्ठल नामाच्या जयघोषात ही दिंडी सर्व आव्हानांना पार करत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार, हे नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT