पुणे

आळंदी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

अमृता चौगुले

आळंदी (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : आळंदी शहरात विवाह समारंभ, पर्यटन, देवदर्शनासाठी रविवारी (दि. 18) मोठ्या संख्येने वाहने दाखल झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुण्याकडे जाणार्‍या शहरातील जुन्या व नव्या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर वाय जंक्शन चौकात 'चक्का जाम' झाल्याचे चित्र होते. शहरातील चावडी चौक, वडगाव चौक, मरकळ चौकात देखील पूर्णपणे 'चक्का जाम' झाल्याचे चित्र होते. ये-जा करणार्‍या वाहनांमध्ये समन्वय नसल्याने जो जागा भेटेल तेथून वाहने घालू लागला, शेवटी वाहतूक कोंडी झाली.

पोलिसांचा चाकण चौक, वाय जंक्शन चौकात अभाव दिसून आला, तर शहरातील रस्त्यावरील वाहतुकीबाबत कायमस्वरूपी नियोजनबद्ध आराखडा राबविण्याची नागरिकांच्या मागणीची गरज रविवारच्या वाहतूक कोंडीने अधोरेखित झाली. शिवाय रस्त्यावर पार्क केलेली वाहने, कार्यालयांना स्वतःची पार्किंग नसताना भरविलेले मोठे विवाह सोहळे या सगळ्यांचा विचार करताना वाहतूक विभाग किती सतर्क आहे, हे आजच्या वाहतूक कोंडीने अधोरेखित झाले.

गायकवाडांच्या दूरदृष्टीची आळंदीकरांना आली आठवण
शहरात वाहतूक कोंडीला वाय जंक्शन येथील जोडणारे दोन रस्ते करणीभूत ठरताहेत, हे ओळखून शहरात प्रवेश करण्यासाठी एक मार्ग व बाहेर पडण्यासाठी एक मार्ग, असा एकेरी वाहतुकीचा पर्याय आळंदीचे तत्कालीन प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी राबविला होता. त्या वेळी वाहतूक कोंडीत त्यामुळे चांगली सुधारणा झाली होती.

वाहतूक विभाग निष्क्रिय
देहूफाटा चौकात वाहतूक नियंत्रण आणि पूर्ण शहरात दंडपावती फाडण्याशिवाय वाहतूक विभागाचे काम दिसून येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरात वाहतूक कोंडी झाली असताना काही ठिकाणी वाहतूक पोलिसांचा मागमूस देखील दिसून आला नाही. वाहतूक विभागातील कडक कारवाई वारीकाळात वाहतूक पोलिसांची दिसून आली, ती आता का नाही? असाही सवाल उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT