Ajit Pawar Research Center Pudhari
पुणे

Ajit Pawar Research Centre: पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्रासाठी 72.75 कोटींचा निधी मंजूर

अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रयोगशाळा, गोठे व प्रशिक्षण सुविधा उभारणीला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास राज्य सरकारने 72.75 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रयोगशाळा उभारणी, शेतकरी वसतिगृह बांधकाम, प्रशिक्षण हॉल व प्रशासकीय इमारतीसह अन्य कामांना सुरुवात झाली. पुढील दोन वर्षांत हे केंद्र पूर्णक्षमतेने कार्यान्वित होण्याची अपेक्षा या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी व्यक्त केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या केंद्रासाठी नोव्हेंबर 2020 पासून वेळोवेळी विशेष अर्थसाहाय्य मंजूर केल्यामुळेच हा प्रकल्प कार्यान्वित होऊन देशी गायींच्या संवर्धनास मोठी मदत झालेली आहे. ज्याचा उपयोग महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गतच्या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येथील कृषी महाविद्यालयातील हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या केंद्रात भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गायींचे संवर्धन, संगोपन व जतन केले जात आहे. यामध्ये सहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी आदी देशी गायींचे प्रात्यक्षिक युनिट तयार केले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील देशी गायींचे दूध उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न प्रभावीपणे सुरू आहे. या प्रकल्पात 13 पेक्षा अधिक भारतीय देशी गायींच्या जातींचे संगोपन व संवर्धन केले जात आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू असलेली कामे

अद्ययावत गायींचे गोठे, सायलो बंकर उभारणी, बायोगॅस युनिट निर्मिती, कंपोस्टिंग व स्टोरेज युनिट्‌‍स, प्रयोगशाळा उभारणी, शेतकरी वसतिगृह बांधकाम, प्रशिक्षण हॉल व प्रशासकीय इमारत, सेल्स काउंटर व प्रदर्शन गॅलरी, जुन्या गोठ्यांचे नूतनीकरण, दुग्ध प्रयोगशाळा, अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पातील उर्वरित कामांचा समावेश आहे.

भविष्यात प्रकल्पाअंतर्गत सौर ऊर्जा व बायोगॅस आधारित शाश्वत प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, गोपर्यटन केंद्राचा विस्तार करून आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व पर्यावरणपूरक पशुपालन मॉडेल विकसित करण्यात येणार आहे. या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण, पर्यटन व शाश्वत शेती यांचा एकात्मिक विकास साधण्याचा उद्देश आहे.
डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT