पुणे-शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कारखान्याच्या निवडणूकीस वेगळेच राजकीय वळण मिळाले आहे. कारखाना निवडणुकीत विरोधकांना भाजपची मदत होऊ शकते या धसक्याने अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा परिसरात आहे. (Pune News Update)
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा संपूर्ण देशामध्ये ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याचे निवडणुकीत या वेळी प्रथमच पवार घराण्यातील कुणीतरी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत पवारांचे विश्वासू सहकारी कारखाना पाहत होते. यापूर्वी दोन वेळा अजित पवारांच्या पॅनेलला कारखान्याच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेला आहे. शरद पवार यांच्यासह प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि स्वतः अजित पवार यांच्यासह पवार घराण्यातील अनेक लोक या कारखान्याचे सभासद आहेत. अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री असतानाही अचानक संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भातील पक्षाच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेले होते, काही जण आपल्याला मुख्यमंत्र्यांची मदत मिळेल असे सांगत आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय या मतदारसंघात लक्ष घालणार नाहीत आणि तसे त्यांनी घातलं तर मग मी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालू शकतो. यानंतर आता अजित पवार यांनी थेट माळेगाव कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरू- शिष्यांच्या जोडीने अजित पवारांच्या विरोधात पॅनेल करण्याचे नक्की केलेले आहे. या दोघांनी इतिहासात दोन वेळा अजित पवार यांच्या पॅनेलचा पराभव केलेला आहे, ते सध्या भाजपमध्ये आहेत, त्यांना भाजपकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ताकद मिळू शकते हा अंदाज आल्याने आपण स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे का काय या संदर्भातही चर्चा सुरू आहे.