पुणे

सोलापूरच्या स्मार्ट प्रकल्पावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, म्हणाले ”बारामतीचा प्रकल्प हा…”

backup backup

बारामती; पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट प्रकल्पांतर्गत मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट ॲण्ड कपॅसिटी बिल्डिंग या योजनेचे एक फूड इन्क्युबेशन सेंटर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इथे निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे; परंतु सोलापूरकरांचा यासंबंधी गैरसमज निर्माण झाला असून, त्यांचा प्रकल्प बारामतीला पळविला गेल्याची चर्चा आहे. सोलापूरसाठी मंजूर प्रकल्प तेथेच होणार असून, बारामतीच्या प्रकल्पाशी त्याचा काही संबंध नाही, आम्ही कोणाचाही प्रकल्प पळविलेला नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. २६) दिले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सीईओंनी या प्रकल्पाची माझ्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्य शासनाची या प्रकल्पाला मान्यता मिळाली; परंतु दुदैवाने सोलापूर शहरामध्ये सोलापूरचा प्रकल्प बारामतीला पळवला अशा बातम्या आल्या. काहींनी माहिती न घेताच तेथील मंजूर प्रकल्प पळविल्याची विधाने केली. वास्तविक तो प्रकल्प वेगळा आहे. सोलापूरच्या प्रकल्पाचा निर्णय मागेच झालेला आहे. बारामतीत जो प्रकल्प होतो आहे तो वेगळा आहे. सोलापूरकरांचा प्रकल्प पळविलेला नसून, तेथील प्रकल्पही मार्गी लागेल.

बारामतीच्या प्रकल्पाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना, शेतमाल उत्पादक कंपन्यांना होणार आहेच; परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही होणार आहे. या स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्य शासनाकडून ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. २ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. हैदराबादची आयआयएमआय संस्था व अन्य संस्थांकडून मदत मिळणार आहे. मी बारामतीचा लोकप्रतिनिधी आहे. कामे करताना राज्यातील, जिल्ह्यातील तर झाली पाहिजेच, परंतु बारामतीतही चांगले प्रकल्प यावेत, असा माझा प्रयत्न आहे. प्रकल्पाबाबत विपर्यास करणाऱ्या बातम्या आल्या; परंतु सोलापूरचा प्रकल्प तेथेच निश्चित होईल, असे पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT