Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule News
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. रविवारी (दि. २२) मतदान होणार आहे. तर मंगळवारी (दि.२४) निकाल आहे. दरम्यान, निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या जाणाऱ्या नीलकंठेश्वर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.१८) गोविंद बागेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या भेटी दरम्यान कार्यकर्त्यांनी आम्हाला मतदान द्या, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे आपला मोर्चा वळवला आणि शरद पवारांना देखील मतदान करण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मी तुम्हाला मतदान का करावे? तुमचा अजेंडा काय आहे?, असा सवाल कार्यकर्त्यांना विचारला.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे त्यांच्या उमेदवारांशी म्हणजे बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांशी संवाद साधत असतानाच अजित पवार यांच्या पॅनलचे कार्यकर्ते आले आणि सुप्रिया सुळे यांना भेटले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांची विचारपूसही केली.