बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सर्व त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, तरीही काही जण लोकांकडे कामासाठी पैशाची मागणी करत आहेत. पैसे खाण्यास सोकावलेल्या अशा मंडळींना सरळ करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला. मलिदा गँगवरही त्यांनी जोरदार प्रहार केला.
बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात पवार यांनी हा इशारा दिला. माळेगावातील एका शेतकऱ्याला वारस नोंद लावण्यासाठी तलाठ्याकडून १५ हजार रुपये मागितले असल्याची तक्रार पवार यांच्याकडे आली. त्यावर पवार यांनी तालुक्यात कार्यरत अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा दिला.
पवार म्हणाले, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जात आहे. आता आठव्या वेतन आयोगाची तयारी आहे. तरीही काही मंडळी पैसे मागत आहेत. मी असले धंदे खपवून घेणार नाही. मग तो कोणाच्याही वशिल्याने आलेला असू द्या. काहीजण पैसे खायला फारच सोकावले आहेत. मी वारंवार सांगूनही त्यांच्यात दुरुस्ती होताना दिसत नाही. त्यामुळे लक्ष घालून अशा लोकांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे पवार म्हणाले.
पवार यांनी यावेळी प्रत्येक कार्यक्रमात निवेदने देणाऱ्यांचाही समाचार घेतला. माझ्या सहाय्यकांकडे निवेदने दिली. तरी ती माझ्याकडे पोहोचतात. माझ्याच हातात निवेदने द्यावीत, हा आग्रह कशाला, असा सवाल करून पवार म्हणाले, मी एखाद्या कार्यक्रमात असलो, तरी माझ्या कामाचे तेवढे बघा, असे सांगून व्यासपीठावरील काहींना खुणावले जातेय, तुम्ही बटण दाबले म्हणजे... एक लक्षात घ्या मी दुसऱ्यांना आमदार करू शकतो. तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतोय, त्यामुळे तुम्हाला जाणीव नाही, असे पवार म्हणाले.
मी एवढा कडक वागतो तरी काहींकडून मला काम द्या, हे टेंडर मला द्या, अशी मागणी केली जात आहे. एक तर मलिदा गँगमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ज्याला नेतेगिरी करायची आहे, त्याने ठेकेदारी करू नये आणि ज्याला ठेकेदारी करायची आहे, त्याने नेता बनू नये, असे पवार म्हणाले.
तीन हत्ती चौकातील पुलाच्या पाहणीसाठी काहींनी बाहेरून माणसे आणली. त्यांना त्याची माहितीही नव्हती. वास्तविक बारामतीकर साखर झोपेत असताना भल्या पहाटे मी विकासकामांची पाहणी करतो. काम करताना कुठे चुका झाल्या. तर त्या दुरुस्तही करतो. मार्ग काढतो, तज्ज्ञांशी बोलतो. कामे अशीच होत नाहीत. इथे बारामतीकरांना फक्त कोट्यवधींच्या कामाचे आकडे वाचायला मिळतात, ते काही उगीच नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या खा. सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.