बारामती : शहरात पथदिव्याच्या खांबांचे नट-बोल्टसुद्धा चोरीला जात आहेत. खालच्या पट्ट्या चोरल्या जात आहेत, झाडे चोरली जात आहेत. अशांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. असे लोक सापडले तर त्यांना टायरमध्ये घालून मोक्का लावला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. (Pune Latest News)
बारामतीत नटराज नाट्य कला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पवार यांनी शहर व परिसरात केल्या जात असलेल्या विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले की, बारामतीत अनेक विकासकामे केली जात आहेत. विरंगुळ्याची केंद्र उभी केली जात आहेत. पण, तिथेसुद्धा काही लोक नुकसान करीत आहेत. या वेळी त्यांनी टवाळखोरी करणार्यांनाही चांगलेच सुनावले. कोण कुठे लाइन मारायला जाल, तर तुझी लाइनच काढतो अन् टायरखाली घालतो. कोणालाही अजिबात सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका. कुठेही रात्री-अपरात्री वेडेवाकडे काही करू नका. शहरात कायदा सुव्यवस्था राखली गेलीच पाहिजे. कोणाचीही गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना बारामतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सांगितले आहे. पोलिस अधीक्षकांनाही बोललो आहे. ही असले लोक सापडले ना, त्यांना मोक्का लावा. सोडू नका. कोणाचीही चूक सहन करणार नाही. काही बहाद्दर तर झाडेसुद्धा चोरून नेत आहेत. आता मीपण बघतो की चोरणारा दमतो की आम्ही झाडे लावणारे दमतो, असे पवार म्हणाले.