यवत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर सोशल मीडियावर पसरलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दौंड तालुक्यातील यवत येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दंगलग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांना संयम बाळगून शांतता राखण्याचे आवाहन केले.
या प्रकरणाची सुरुवात २६ जुलै रोजी यवत येथील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याने झाली. याप्रकरणी पोलिसांनी अमीन सय्यद नावाच्या आरोपीला अटक केली होती. या घटनेमुळे आधीच तणाव असताना, शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यानंतर हिंदू तरुण आक्रमक झाले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
आक्रमक जमावाने संबंधित तरुणाच्या घरावर दगडफेक केली, तसेच सहकारनगर आणि इंदिरानगर परिसरातील मशिदींची तोडफोड केली. एका बेकरीला आणि काही दुचाकींनाही आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर यवतमधील आठवडी बाजार आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली, तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी ३ ऑगस्टपर्यंत यवतमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. यापूर्वी, ३१ जुलै रोजी 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'ने दौंड तालुका बंदची हाक दिली होती, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भेटीदरम्यान पोलीस प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या यवतमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.