इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत, हे नक्की. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यावे, असे खुले आवाहन शिवसेनेचे उपनेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी (दि. 15) अजित पवार यांना केले. इंदापूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार आज अस्वस्थ आहेत, असे नाही, तर त्यांनी पहाटेच्या वेळीदेखील शपथ घेतली होती हे संपूर्ण देशाला माहिती आहे. अजित पवार हे थोतांड माणूस नाही की कुणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले. यावर अजिबात विश्वास बसत नाही. कारण राष्ट्रवादीत जे चालले होते, ते ठीक नव्हते म्हणून ते भाजपकडे गेले होते, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना प्रादेशिक आहे. ते इकडे आले, तर चांगल्या पद्धतीचे वातावरण होईल. पण, तो अजित पवार यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजकारणात कधी कधी वावड्याही उडवल्या जातात. मात्र, अजित पवार हे भाजपमध्ये येणार, हे कोणाला नाही आवडणार, असे म्हणत शिवतारे यांनी थेट अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावे, असे खुले आमंत्रण दिले. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आले, तर पुरंदरला तुमचा विजय सोपा होईल का? या प्रश्नावर शिवतारे म्हणाले, की पुरंदरच काय संपूर्ण महाराष्ट्रात सोपे होईल. माझा पुरंदरमधील पराभव हा अपघात झाला आहे. आम्ही तिथे प्रचंड विकासकामे केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, पप्पू माने, सीमा कल्याणकर, अशोक देवकर आदी उपस्थित होते.