उपमुख्यमंत्री अजित पवार  File Photo
पुणे

अजित पवार ॲक्‍शन मोडमध्ये! बारामतीच्या सर्व पदाधिकार्‍यांना राजीनामे देण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांच्या या अस्त्रामुळे शहर, तालुक्यात आता भाकरी फिरवली जाणार असून, नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे.

सोमवारी (दि. ५) बारामतीत आयोजित मेळाव्यात पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितले. १५ ऑगस्टपूर्वी पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जाणार आहे. त्यात निष्ठावंताना संधी दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

पवार हे रविवारपासून बारामती दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा बोरकरवाडी येथे जाहीर कार्यक्रम झाला. त्यानंतर ते बाबुर्डी येथे गेले. जिरायती दौर्‍यात पदाधिकाऱ्यांविषयी अनेकांनी पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी सोमवारी तात्काळ निर्णय घेतला.

ते म्हणाले, आपल्याच स्टेजवर बसायचे आणि आपला कार्यक्रम करायचा असे चालले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, दादा तुमचा म्हणवला जाणारा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही. एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे. हे चालणार नाही. अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, पाहायला मिळाल्या आहेत. इथे बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे, आपण प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या बुथवर जिथे मतदारयादीत नाव आहे, तेथे तरी घड्याळाला मताधिक्य मिळाले का असा सवाल त्यांनी केला. तसेच १५ ऑगस्टपूर्वी नवीन निवडी केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT