Ajit Pawar On Nilesh Ghaywal Row :
पालकमंत्री अजित पवार यांनी गुंड निलेश घयावळ प्रकरणावर अतिशय कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राजकीय वरदहस्त मिळणार नाही आणि यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. पुण्यात बोलताना आज (दि. १० ऑक्टोबर) त्यांनी मी पोलीस कमिशनरांशी बोललो आहे. काहींच्या शिफारसीनंतरही घयावळला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी शस्त्रपरवान्याच्या अनुषंगाने माहिती दिली. "मी याबाबत थेट पोलीस आयुक्तांशी (CP) बोललो आहे," असे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी त्यांना स्पष्ट केले आहे की, जरी काही राजकीय शिफारसी आल्या असल्या तरी घयावळला शस्त्रपरवाना देण्यात आलेला नाही. यातून प्रशासनाने कोणताही राजकीय दबाव झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र अजित दादांच्या या वक्तव्यानंतर घयावळला शस्त्र परवाना देण्यासाठी राजकीय दबाव होता हे अधोरेखित होतं. तसंच कालच अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच घयावळला शस्त्रपरवाना देण्याची शिफारस केली होती असा दावा केला होता. योगेश कदम हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत. त्यामुळं युतीत धुसफूस निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
अजित पवार यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, "तो कुणाचा कार्यकर्ता, कुणाचा नेता, कुणाबरोबर फोटो असलं काही बघू नका. जर चूक असेल, कायदा हातात घेतला असेल, तर त्याच्यावर अॅक्शन (कारवाई) घ्या."
याबाबतची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, "मी याबाबत कुणचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही." तसेच, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील तीच भूमिका आहे. "अजीबात कोणाची फिकीर करायची नाही. ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर रीतसर कारवाई करायची," असे एकमत तिन्ही नेत्यांमध्ये झाले आहे. पुणे असो वा महाराष्ट्रात कुठेही, कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखणे, हे आपले आणि पोलिसांचे काम आहे, यावर त्यांनी जोर दिला.
गुन्हेगारांसोबत राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल होण्यावरही त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, "कोणीही येतं आणि आमच्यासोबत फोटो काढतात. ती व्यक्ती कोण आहे, हे आम्हाला माहिती नसते." मोबाईलमुळे सेल्फी काढणे सोपे झाले आहे. मात्र, "एखाद्यासोबत फोटो काढलेला असेल, तर त्याच्यासोबत संबंध असेल असं काही नाही. मात्र जर चौकशी करत असताना त्यांचे फोन संभाषण आढळले, तर" (संबंध स्पष्ट होईल), असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
एकंदरीत, पालकमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची ठाम भूमिका घेतली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणताही राजकीय आधार न देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
याचबरोबर पत्रकारांनी घयावळवर चंद्रकांत पाटील यांचा वरदहस्त आहे असं बोललं जात आहे असं विचारलं त्यावेळी त्यांनी पत्रकारांनाच फटकारत याबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळलं.