पवार परिवाराकडून आता जेवणं, वर्गण्या, साड्या वाटप File Photo
पुणे

Ajit Pawar | पवार परिवाराकडून आता जेवणं, वर्गण्या, साड्या वाटप

पुढारी वृत्तसेवा

बारामती: लोकसभा-विधानसभा निवडणुकीत बारामतीत आत्तापर्यंत कधी झाले नाही ते घडू लागलेय. पवार मंडळी जेवणं घालू लागली आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलावू लागली आहेत. गणपती, ईद, नवरात्रीला मंडळांना भरभरून वर्गणी देवू लागली आहेत. कुठे साड्या वाटप केले जात आहे. बारामतीकरांसाठी हे काही तरी वेगळं घडत आहे. तालुक्यात अशी प्रथा या अगोदर नव्हती. मात्र निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे प्रकार सुरु आहेत, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबातील आपल्या विरोधातील अन्य सदस्यांवर सडकून टीका केली. बारामतीत बुथ कमिटीच्या मेळाव्यात त्यांनी पवार परिवारातीलच विरोधी सदस्यांवर जोरदार निशाणा साधत फटकेबाजी केली.

अजित पवार पुढे म्हणाले की, कारखाने, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत घडत असलेले प्रकार आपण यापूर्वी लोकसभेला पाहिला. नगरपरिषद निवडणूक असली की काही लोक दरवाजा उघडा ठेवूनच बसतात. आमची एवढी मते आहेत, असे सांगतात. आता हे लोण पार विधानसभा निवडणूकीपर्यंत येवून पोहोचले आहे. बारामतीत अशी कधी प्रथा नव्हती. बारामतीकरांसाठी हे सगळे नवखे आहे.

विषय भावा-भावांचा अन् जावा-जावांचा

पवार म्हणाले, कुटुंबात भांड्याला भांडं लागतं..!, जावा-जावांच्यात किती पटतं मला माहिती आहे. भावा-भावांच्यात ही किती पटतं तेही मला माहिती आहे. अलीकडे चुलत्या- पुतण्यातही ही किती पटतं हे मला माहिती आहे आणि बहिण भावाचंही माहित आहे.! त्याच्यामुळेच मी लाडकी बहीण योजना काढली आणि सगळ्याच बहिणींना खुश केले.

मला ही खूप 'इगो' आहे

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, तुम्ही तुमचा 'इगो' लांब ठेवा. मला ही खूप 'इगो' आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतो आहे. बऱ्याचदा महिलांकडून हातात राखी बांधताना दिसतोय. हात मिळवणी करतो आहे. माझ्या परीने जेवढं माणसात मिसळता येईल तेवढा प्रयत्न करतो आहे. जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून विरोधकांवर मी एकदाही टीका केली नाही. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. मलाही खूप 'इगो' आहे. पण हा 'इगो' बाजूला ठेवून आपण केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजेत.

खा.सुळेंना लगावला टोला

विरोधक काहीही बोलतील, त्यांना आता विकासकामांबद्दलही शंका यायला लागली आहे. फक्त इमारती उभ्या करणे, रस्ते तयार करणे, पुल बांधणे हा विकास आहे का? असे ते म्हणत आहेत. त्यांच्या विकासाची व्याख्या वेगळी असावी असे म्हणत त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.

कार्यकर्त्यांचे टोचले कान

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे कान टोचताना पवार म्हणाले, आपल्यातील जे मतभेद, गटतट आहेत ते विधानसभेपर्यंत विसरा. ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. या गोष्टीचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मतभेदाबाबत बोलायचे नाही. एक जीवाने विधानसभेच्या कामाला लागा मतदारांपर्यंत संपर्क ठेवा, मतदान होईपर्यंत कोणीही कुठलेही दौरे करू नका, तोलून मापून बोला, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. निवडणूकीत मतभेद निर्माण करण्याचे, खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होतील पण त्याकडे लक्ष देवू नका, असेही ते म्हणाले. आपले नाणे खणखणीत आहे, ते वाजवून दाखवा असे आवाहन त्यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT