शिवनगर : Farmers Loan Waiver in Maharashtra | सध्याच्या स्थितीत राज्याची आर्थिक स्थिती पाहताना किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या आधी आपल्या कर्जाची परतफेड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आणि शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी यावर सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, हे मान्य करत उपमुख्यमंत्री पवार यांनी, परंतु आता कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही आश्वासन दिले होते; पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता शेतकऱ्यांना सध्या तर नाहीच; परंतु आणखी किमान तीन वर्षे तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरणाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत होते, त्यावेळी फोटो काढत असताना कोनशिलेजवळ नेत्यांची गर्दी झाल्याने अडचण निर्माण होत होती, त्यावेळी अजित पवार पुढे आले आणि त्यांनी नेत्यांना मागे ढकलले. अजित पवारांच्या शिस्तीला नेत्यांनी हसून दाद देत मागे सरकणे पसंत केले.