पुणे

‘…तर पोलिसांना सांगून बाहेर काढीन!‘

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती कृषि विज्ञान केंद्रावर सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनानंतर आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांच्या भाषणावेळी विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरुच होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाच्या शेवटी विद्यार्थ्यांना '…तर पोलिसांना सांगून बाहेर काढीन', अशा आपल्या स्टाईलने शिक्षकाची भूमिका घेत खडे बोल सुनावले.

या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून विद्यार्थी सकाळी लवकरच आले होते. कार्य़क्रमस्थळी त्यांना दोन तासांहून अधिक वेळ त्यांना थांबावे लागले होते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात चुळबुळ सुरु होती. विद्यार्थ्यांचा गोंगाट वाढत होता. या गोंगाटातच सारंग साठे, खासदार सुप्रिया सुळे, शास्त्रत्र अनिल काकोडकर यांचे भाषण उरकले.

उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला उभे राहिल्यावर त्यांच्या खड्या आवाजाने काही काळ शांतता राहिली. पण ती फार काळ टिकली नाही. या गोंगाटातच त्यांनाही भाषण करावे लागले. पण आपल्या कडक, शिस्तप्रिय स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱया पवार यांनी भाषणाच्या शेवटी विद्यार्थ्यांचे कान टोचलेच.

पवार म्हणाले, आता वेगवेगळी भाषणे चालू असताना तुम्ही थोडीशी गडबड केली आहे. बोलणं बंद केलेले नाही. आता माझं भाषण संपल्यावर पवार साहेबांचे भाषण सुरु होणार आहे, जर का कुठल्या विद्यार्थ्याने तोंडातून शब्द काढला, तर पोलिसांना सांगून बाहेर काढायला लावेन. एकदम पीनड्राॅप सायलेंट पाहिजे. अशा शब्दात शिक्षकी भूमिका घेत पवार यांनी विद्यार्थ्यांचे कान टोचले. त्यानंतर मात्र चिडीचूप वातावरण तयार झाले.

SCROLL FOR NEXT