Ajit Pawar Identified Wrist Watch
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून बारामतीसह राज्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत भीषण असलेल्या या अपघातात मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, अखेर हातातील घड्याळावरून अजित दादांची ओळख पटल्याचे समोर आले आहे.
अपघात झाला तेव्हा जवळच असलेल्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. एका महिलेने घटनेचे भयानक वर्णन करताना सांगितले की, "आम्ही आमच्या म्हशींजवळ होतो. स्फोट आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की आम्ही बादल्यांमध्ये पाणी घेऊन धावत सुटलो. तिथे मृतदेह विखुरलेले होते. एका मृतदेहाचे शिर धडावेगळे झाले होते. आम्ही खूप घाबरलो होतो, तरीही आम्ही ब्लँकेट आणि कपडे आणले आणि ते विखुरलेले मृतदेह झाकले. पोलिसांना येण्यासाठी वेळ लागणार होता, तोपर्यंत आम्ही तिथे उभे होतो."
अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची अवस्था पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून १५-२० मिनिटांत आग आटोक्यात आणली. मृतदेहांचे चेहरे ओळखता येत नव्हते, एक मृतदेह पूर्णपणे जळालेला आणि सुजलेला होता. मात्र, त्या मृतदेहाच्या हातातील घड्याळावरून हा मृतदेह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट झाले. योगायोगाने, 'घड्याळ' हेच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार वेगळे झाले. कायदेशीर लढाईनंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळालं. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला तेव्हा चरखा या चिन्हाची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने ते नाकारलं. त्यानंतर राष्ट्रवादीकडून १० वाजून १० मिनिटांची वेळ दाखवणाऱ्या घड्याळ चिन्हाची मागणी केली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह 'निळ्या रंगाचे आलार्म घड्याळ' हे आहे.