पुणे

कुणाचीही एजंटगिरी चालणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महसूल विभागातील एजंटगिरी चर्चेत असून, जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटला भेटल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे कुणाचेही पाहुणे असले तरी एजंटगिरी सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमातच अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. विधानभवन येथे विभागीय आयुक्तालयातून राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.

पुणे विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, महसूल विभागातील अधिकार्‍यांची कामगिरी चर्चेत आहे. ही चर्चा चांगली किंवा वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे. मुख्यमंत्री कार्यालयापेक्षा भव्य इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाची बांधली. तसाच कारभार झाला पाहिजे. कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची अधिकार्‍यांनी काळजी घेतली पाहिजे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे राज्याच्या प्रशासनाचा नावलौकिक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. फक्त कणा मजबूत असून चालणार नाही, तर संपूर्ण शरीर मजबूत असावे लागते. त्यासाठी कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकार्‍यांनी प्रशासनाची कामगिरी उत्तम होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय व्यवस्था अधिक गतिमान करण्याचे काम करताना परस्पर समन्वय ठेवावा, असेही पवार म्हणाले.

महसूल विभाग लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न
राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन होत आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अन्य विभागांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरेल. महसूल विभागाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल सप्ताह यशस्वी होईल. सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जमिनीचे प्रश्न निकाली निघावेत त्यासाठी या सप्ताहामध्ये 'सैनिक हो तुमच्यासाठी' असा एक दिवस ठेवला आहे. या निमित्ताने सैनिकांना न्याय देण्याचे काम व्हावे, असेही विखे पाटील म्हणाले.

सौरभ राव तुम्ही निवांत झोपा
काम करणारा अधिकारी म्हणून सौरभ राव यांना नागपूर येथून पुणे जिल्हाधिकारी म्हणून 2014 च्या पूर्वी आणले आहे. तेव्हापासून सौरभ राव पुणे सोडायला तयार नाहीत. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे. थोडा पॉझ घेत सौरभ राव तुम्ही टेन्शन घेऊ नका, रात्री शांत झोपा, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT