पुणे: एखादा आरोपी सापडत नसेल, तर कोणी स्वत:च्या घराच्या काचा फोडत नाही. मग सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान का करण्यात येते? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारा पक्ष असेल किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील, पक्षाकडून वसुली झाली पाहिजे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचे नाव न घेता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेची सुरुवात पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर वसंत मोरे यांनी बसस्थानक परिसरात तोडफोड केली होती. त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी भाष्य केले.
पवार म्हणाले, राग येण्याबाबत दुमत नाही. मात्र, काही जण अतिरेक करत आहेत. संपूर्ण राज्याच्या देखभालाची जबाबदारी यांच्यावर सोपवली असल्यासारखे काही जण अतिउत्साह दाखवत आहेत. त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल. एखादे विशिष्ट प्रकरण डोळ्यांसमोर ठेवून काही प्रकरणांत तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर पोलिस संबंधित व्यक्तीला अटक करण्यासाठी जाळे लावतात. त्यांच्या परीने पोलिस तपास करत असतात. त्यांच्या आधीच माध्यमे बातम्या देऊन मोकळे होतात.
आरोपीला पकडल्यानंतर दाखवायला हवे. अशा अत्याचाराच्या घटना अजिबात घडता कामा नये, अशी नागरिकांबरोबर सरकारचीसुद्धा भूमिका आहे. मात्र, काही घटना घडल्यानंतर त्याचा तपास तातडीने लागण्यासाठी काही गोष्टींचे तारतम्य राज्यकर्ते, सत्ताधारी पक्षांसह सगळ्यांनी बाळगायला हवे. पोलिसांचा अहवाल येऊ द्यावा. त्या वेळी नेमके काय घडले, हे समजेल. उतावीळपणा करू नका. माहिती घेण्याच्या आधी बोलून मोकळे होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पात सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न
नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. कामकाज सल्लागार समितीने अर्थसंकल्प सादर करण्यासंदर्भात मान्यता दिली आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थसंकल्प मांडला जाईल त्या दिवशी सगळे चित्र स्पष्ट होईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
सर्वांना पक्षवाढीचा अधिकार
महाराष्ट्राच्या जनतेने मोठे बहुमत दिले आहे. याचबरोबर प्रत्येकाला आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे ते ज्या ठिकाणी जातील तेथे पक्षवाढीसंदर्भात बोलतील. महायुतीतील तीनही पक्षांनी एकजुटीने राहण्याचे ठरविले आहे. कार्यकर्त्यांना कृती आणि प्रोत्साहन देण्यासाठी भगवामय पुणे जिल्हा करण्याचे वक्तव्य केले आहे. जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून महायुतीच्या माध्यमातून काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.