विमाने दिवसा व रात्री त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी अचूक व सुरक्षितरीत्या पोहचण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने उपग्रहाद्वारे मिळणार्या सिग्नल्समुळे, जीपीएसच्या साहाय्याने विमानाची अचूक दिशा व स्थान निश्चित केले जाते. इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम आणि फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टिम ही यंत्रणा विमानाचा मार्ग ठरवून त्यास स्वयंचलित मार्गदर्शन पुरवते, तर रडार व कम्युनिकेशन साधने मार्गातील हवामान, अडथळ्यांची माहिती, इतर विमानांचे स्थान आणि नियंत्रण केंद्राशी सातत्यपूर्ण संपर्क राखण्याचे काम करतात, असे हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले. (Pune Latest News)
मध्यरात्री विमाने बिनचूकपणे कसा प्रवास करतात, निश्चित स्थळी कशी पोहचतात आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना ती रात्रीची धावपट्टीवर कशी उतरतात, याची उत्सुकता प्रत्येकाला असते. वाहतूकतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानांच्या सुरक्षा व मार्गदर्शनासाठी एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका सतत बजावत असते. एटीसीकडून वैमानिकांना रेडिओद्वारे दिशा, उंची, गती तसेच इतर आवश्यक सूचना दिल्या जातात व इतर विमानांपासून सुरक्षित अंतर राखण्यास मदत केली जाते.
विशेषतः रात्री, खराब हवामानात किंवा कमी द़ृश्यमानतेत इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टिमसारखी साधने धावपट्टीवर अचूक उतरण्यास मदत करतात. यामध्ये लोकलायझर, ग्लाइड स्लोपसारखी उपकरणे विमान सुरक्षित उतरण्यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय धावपट्टीवरील विशिष्ट रंगांचे दिवेदेखील वैमानिकांना मार्गदर्शन करतात.
ऑटो पायलट, उपग्रह प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज विमान, ड्रोन अत्यंत सुरक्षित व अचूक उड्डाण करीत आहेत. दिशा, वेग, उंची आणि हवामान यांचे सतत परीक्षण करीत स्वयंचलित प्रणाली विमानास मार्गदर्शन करीत असल्यामुळे रात्री किंवा प्रतिकूल हवामानातदेखील विमान सुरक्षितपणे उतरू शकते. त्यामुळे हवाईप्रवास केवळ अधिक विश्वासार्ह व सुरक्षितच नव्हे, तर प्रवासी व मालवाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम, वेगवान आणि लोकप्रिय होत आहे.धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ