देहूरोड : किवळे येथे के. व्हिला बांधकाम साईटवरील आर.एम.सी. प्लांट नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच, यामुळे प्रदुषणातही वाढ झाली आहे.
धुळीमुळे राजारामनगर, जुनावणे वसाहत व दत्तनगर येथील नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. आर.एम.सी. प्लांटकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. के. व्हिला या बांधकामासाठी मुकाई चौक येथेही दुसरा प्लांट सुरू आहे. तेथेही नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ प्लांट सुरू ठेवला जात आहे.
तसेच राजारामनगर ते आदर्शनगर येथील रस्त्याची रूंदी 14 ते 15 फूट आहे. यातच आर.एम.सी. प्लांटची मोठे वाहने ये-जा करत असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित आर.एम.सी. प्लांटधारकावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या पुणे, मुंबई व पिंपरी चिंचवड पर्यावरण विभागाकडे केली असल्याचे काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस शाम भोसले तसेच शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते रोहित माळी यांनी केली आहे.
या आर.एम.सी. प्लांटमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. घरातील पिण्याच्या पाण्यात, जेवणातही ही धूळ मिसळुन आरोग्य धोक्यात आले आहे.
– शाम भोसले, सरचिटणीस, काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरलॉकडाऊनमुळे कामगार नसल्याने आरसीएम प्लांट सुरू केला. हवा जास्त असल्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. त्याबद्दल नागरिकांची मी माफी मागतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने 24 मे रोजी भेट देऊन सूचना केल्या आहेत. त्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांत परिसर स्वच्छ होईल.
– राकेश कंद, आर.एम.सी. उद्योजक