पुणे: शहरात मे आणि जून महिन्यात सरासरीपेक्षा 80 टक्के अधिक पाऊस झाल्याने हवेतील धूलिकणांचे प्रमाण 70 टक्क्यांनी घटले आहे. कोरोनाच्या लाटेत शहरातील वाहतूकच थांबल्याने 2020 मध्ये अशी स्थिती तयार झाली होती. त्यानंतर यंदाचा जून हा सर्वांत कमी धूलिकणांचा महिना ठरला आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूड या अतिप्रदूषित भागांतील प्रदूषणही खूप कमी झाले आहे.
शहरातील हवेचे प्रदूषण तब्बल 70 टक्क्यांनी घटले आहे. पृथ्वी मंत्रालयाच्या पुण्यातील ’सफर’ या संस्थेने ही नोंद केली आहे. सध्या पुणे शहराची हवा देशात सर्वांत शुद्ध असून, शहराला छान (गुड) असा शेरा मिळाला आहे, तर दिल्ली, मुंबई, अहमदाबाद या सतत वाहन धूलिकणांत अतिप्रदूषित ठरणार्या शहरांत पुणे शहराने बाजी मारली आहे. (Latest Pune News)
बाकी सर्व शहरांना समाधानकारक असा शेरा आहे. मात्र, पुण्याची हवा अतिशुद्ध गटांमध्ये गेली आहे. याचे मुख्य कारण शहरात मेमध्ये झालेला 275 टक्के पाऊस, तर जूनमध्ये झालेला 80 टक्के जास्त पाऊस, हे आहे. कारण, यंदा 15 मेपर्यंत शहराचे हवाप्रदूषण धोक्याच्या पातळीवर होते.
शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता
30 ते 49 मायक्रोग्रॅम प्रति चौ. मी.
पीएम 10 (सूक्ष्म धूलिकण)ः 56
पीएम 2.5 (अतिसूक्ष्म धूलिकण)
ओझोन, नायट्रस ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइडचेही प्रमाण खूप कमी
हवा गुणवत्तेचे प्रमाण कसे मोजतात?
0 ते 50 चांगली (हिरवा रंग)
51 ते 100 समाधानकारक (पोपटी रंग)
101 ते 200 मध्यम (पिवळा रंग)
201 ते 300 खराब (तांबडा रंग)
301 ते 400 अतिखराब (लाल रंग)
401 ते 500 घातक (चॉकलेटी रंग)