पुणे

अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून बारामतीत राजकीय घमासान रंगणार

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून बारामतीत 'राष्ट्रवादी विरुद्ध भाजप' असा सामना येत्या आठवड्यात रंगणार आहे. भाजपकडून शनिवारी (दि. 24) आयोजित जयंती महोत्सवाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून रविवारी (दि. 25) आयोजित महोत्सवाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आल्यापासून राष्ट्रवादी व भाजपमध्ये बारामतीत शीतयुद्ध सुरू झाले आहे. सेना-भाजप सरकारने हा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची गोची झाली. नामांतराच्या निर्णयाचे राष्ट्रवादीने स्वागत केले. परंतु, यानिमित्त भाजपने राष्ट्रवादीवर कडी केली. नामांतरासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद देवकाते यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी ताकद लावली होती. त्यानुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नामांतराचा निर्णय घेतला. बारामती तालुक्यात धनगर समाजाचे मोठे प्राबल्य आहे.

आगामी निवडणुकीत नामांतराचा फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजपकडून होईल. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही यानिमित्त शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली काही वर्षांपासून बारामतीत दोन जयंती उत्सव साजरे होत आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते हे अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जयंतीचे आयोजन करीत असतात.

भाजपचा युवा चेहरा असणारे अभिजित देवकाते यांना जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदाची संधी मिळाली आहे. तेही गेली काही वर्षे जयंतीचे आयोजन करीत आहेत. यंदा मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 2024 च्या लोकसभेची तयारी म्हणून भाजप याकडे पाहत आहे, तर राष्ट्रवादीने आपला गड अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 25 तारखेच्या जयंतीसाठी राष्ट्रवादीने थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आमंत्रित केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्वतः नियोजनात सहभागी झाले आहेत. या वेळी खासदार सुळे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

राष्ट्रवादीने सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या तिन्ही साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात बैठकांचे आयोजन केले आहे. तालुक्यातील विविध संस्थांचे, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच ते सदस्यांपासून ते पदाधिकार्‍यांच्या बैठका कारखाना अध्यक्षांच्या उपस्थितीत घेतल्या जाणार आहेत. यानिमित्त राष्ट्रवादी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे भाजपकडून 24 तारखेला आयोजित महोत्सवासाठी मंत्री महाजन व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी मान्यवर येत आहेत.

या वेळी ना. महाजन यांना 'अहिल्यारत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 'मोदी ऽ 9' कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप सध्या जनतेशी संवाद वाढवत आहे. त्यातच यंदा जयंतीसाठी मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी बारामतीतील वातावरण ढवळून निघणार आहे. राजकीय घमासान यानिमित्त पाहायला मिळणार असून, नामांतरावरून सुरू झालेला संघर्ष अधिक टोकदार होण्याची चिन्हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT